पिंपरी चिंचवड : व्हॉट्सअॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरी चिंचवडमधल्या एका अंध दाम्पत्याचं जगणं मुश्कील झालं आहे.


'फोटोमधील लहान मुलगी ही पिंपरीतल्या अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दिसली आहे. भिकारी म्हणतात, की ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखं नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा... काय माहिती, कोणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल.'

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या चार ओळींच्या मेसेजमुळे या अंध दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

धर्मेंद्र लोखंडे आणि शीतल लोखंडे, जन्माने 100 टक्के अंध. 2012 मध्ये दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या वर्षी एक गोंडस मुलगी झाली. पण तीच मुलगी त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कुणीतरी त्यांच्या फोटोसकट व्हायरल केली आणि त्यांच्यामागे लोकांचा ससेमिरा सुरु झाला.

भेदरलेल्या दाम्पत्याला काहीही कळेना. दोघांवर त्यांच्याच मुलीच्या अपहरणाचा आरोप लागला होता. या दाम्पत्याची कौटुंबिक माहिती घेण्यासाठी 'एबीपी माझा'ची टीम त्यांच्या घरीही गेली, तेव्हा या दोघांचा सच्चेपणा आणखी गडद झाला.

सिंधुबाई निकम या अंध दाम्पत्याच्या शेजारी राहतात. माझ्या डोळ्यासमोर दोघांचं लग्न झालं. माझ्यासमोर मूल झालं. लोकांनी असं करायला नको, असं त्या पोटतिडकीने सांगतात.

ज्यांनी आयुष्यात कधीच उजेड पाहिला नाही, ते दाम्पत्य सध्या डोळस माणसांच्या अंधविश्वासामुळे संशयाच्या अंधारात चाचपडत आहे.

व्हॉट्सअॅपर येतं, ते सगळंच खरं असं मानून, आला मेसेज की कर फॉरवर्ड या संस्कृतीमुळे धोका वाढला आहे. तंत्रज्ञानावर ताबा कसा मिळवलता येईल हे माहित नाही. आपण आपल्यावर मात्र ताबा ठेवण्याची गरज आहे.