Pune Crime news :  पुण्यातील (Pune) येरवडा कारागृहात ( yerwada jail) कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला आहे. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली आहे. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. 


घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली आहे. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाचही जणांवर वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांर्गत त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तरंग परदेशी हा नवी खडकी येथील गुंड असून त्याच्यावर तरुणावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पुरुषोत्तम वीर आणि त्याच्या साथीदारांनी मांजरी परिसरात दरोडा टाकला होता. त्यांचा दरोडा आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.


फरशी आणि दगडाच्या तुकड्यांनी मारहाण
सोमवारी सकाळी 8 वाजता कैद्याच्या भांडणाची सुरुवात झाली. त्यावेळी समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव या सगळ्यांनी बंद खोलीतील कैद्यांच्या दिशेने फरशी आणि दगडाचे तुकडे फेकून मारत होते. हा सगळा प्रकार तक्रारदार हवालदार आणि कारागृहातील काही कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होते. या सगळ्यांनी हा प्रकार आटोक्यात आणण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कैद्यांनी हवालदाराला हातापायांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार घडत असताना पुरुषोत्तम वीर आणि देवा जाधव यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कैद्यांमध्ये वर्चस्वासाठी लढाई
कैद्याच्या वर्चस्वासाठी हा प्रकार घडला आहे. कारागृहाच्या 27 ते 31 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये कैद्यांची कोलाहल, मारहाण आणि दगडफेकीच्या घटना उघडकीस आल्याने कैदी आणि वृद्ध कैद्यांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई देखील करण्यात आली आहे.