पिंपरी : पिंपरीत हायटेन्शन तारांमध्ये अडकलेला मांजा काढणं चिमुरड्याच्या जीवावर बेतलं आहे. मांजा काढताना विजेचा धक्का लागल्यानं जखमी झालेल्या आकाश प्रजापतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मकरसंक्रांत सुरु असल्यामुळे राज्यभरात विविध वयोगटातली मुलं पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. मात्र लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष किंवा निष्काळजी त्यांच्या अंगलट येऊ शकतं, हे पाहायला मिळत आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजता 10 वर्षाचा आकाश हायटेन्शन तारांचा धक्का लागल्यानं गंभीर जखमी झाला होता. 75 टक्के जळालेल्या आकाशवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
बुधवारी रात्री उशिरा आकाशचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत आकाशसोबत जखमी झालेले त्याचे दोन भाऊ आर्यन आणि अभिनंदन सुखरुप आहेत.
काही दिवसांपूर्वी पतंग पकडताना विहिरीत पडून एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे पतंग उडवण्याचा आनंद लुटताना जीवाची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.