पुणे: आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती आहे. यानिमित्त सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. किल्ले शिवनेरीवरील सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. त्याचबरोबर इतर आमदार, मंत्री आणि नेते देखील उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याच्या स्टोजवरती असा एक चेहरा होता ज्यांंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवनेरी किल्यावरील स्टेजवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भूवया उंचावल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील एकमेव आमदार आमदार बापू पठारे आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात दिसून आले. ते शासकीय कार्यक्रमाच्या मंचावरती बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी वडगाव शेरीचे विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या नावाचा देखील उल्लेख केल्याचं दिसून आलं, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा रंगल्या आहेत.


बापू पठारे अजितदादांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा 


शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बापू पठारे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एका व्यासपीठावर दिसून आल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.


शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर शिंदे आणि अजित पवारांच्या मागे दुसऱ्या रांगेत बापू पठारे बसलेले होते. तर या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आणि भेटीचं स्पष्टीकरण देताना, मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याचं बापू पठारे यांनी सांगितलं आहे.