पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 22 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसतंय. त्याचवेळी त्यांचे विरोधक आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. उपमुख्यमंत्री मीच, आमदार मीच, सगळं मीच... अरे चाललंय काय? असा प्रश्न तावरेंनी विचारला. अजित पवारांची एक ना धड भाराभर चिध्या अशी अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली.
मीच करू शकतो असं आम्ही कधीच म्हणालो नाही आणि म्हणणारही नाही. आमचं आणि अजित पवारांचं वैचारिक भांडण आहे. उपमुख्यमंत्री तेच, मंत्री तेच, आमदार तेच, सगळंच त्यांना पाहिजे असं म्हणत चंद्रराव तावरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
Malegaon Sugar Factory Election : अजित पवार फक्त बोलतात
चंद्रराव तावरे म्हणाले की, "गेल्या काही दिवसापासून अजित पवार मी हे करू, ते करू सांगत आहेत. पण अजित पवार फक्त बोलतात, काही करत नाही असा खोचक टोला चंद्रराव तावरे यांनी लगावला. आमच्याकडे 21 च्या 21 उमेदवार हे चेअरमन पदाच्या पात्रतेच्या आहेत. अजित पवारांच्या पॅनल मध्ये चेअरमन होणारं दुसरं कुणी आहे का ते सांगावं."
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची साखर भिजली आहे. पण अजित पवार खोटं बोलत आहेत. जो आमच्या हिताच्या आड येईल त्याला आम्ही आडवा करू. अजित पवार हे खाजगीकरणालाच बळ देतात. अजित पवार सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत.
Chandrarao Taware On Ajit Pawar : यांनी तालुक्याची काय प्रतिष्ठा ठेवली?
या आधीही चंद्रराव तावरेंनी या आधीही अजित पवारांविरोधात टीका केली होती. उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत. यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली असा सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला होता.
माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचे बळिराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ही बातमी वाचा: