Chandrakant Patil On Tanaji Sawant : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी एखादं वाक्य म्हटलं की त्याची मोडतोड करून ते समोर आणलं जातं. ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो. माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी होते किंवा तानाजी सावंत असं वक्तव्य करतात त्यावेळी उठसूट गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही, असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बाजू घेतली आहे.
तानाजी सावंतांची भाषा ग्रामीण भागातील लोकांना चांगली समजते. मराठा समाजाला (maratha reservation) आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यानंतर ते रद्द केल्यानंतर अडीच वर्षात कोणीही आंदोलनं केली नाहीत किंवा मोर्चा काढण्याची भाषा केली नाही, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मात्र अनेकांनी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यावरुन आक्रमक झाले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
'PFI कारवाईबाबत पोलिसांवर ताण आणू नका'
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या विषयाची आपल्याला अपुरी माहिती असेल तर आपण काही म्हणू नये. गृहमंत्री कायद्याचे तज्ञ आहेत त्यामुळे ते योग्य भूमिका घेतात. त्यामुळे या विषयावर मी माझं मत व्यक्त करणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे की नाही हा गंभीर विषय आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे, पोलिस प्रशासनावर कोणीही ताण आणू नये. तुम्ही काय करता? असं पोलिसांना सातत्याने विचारू नये, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
'स्वयंशिस्त बाळगून नवरात्रोत्सव साजरा करा'
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी सुख आणि समाधान मागितलं आहे. मी असं आवाहन करेन की लोकशाही जशी चांगली आहे तशीच तिचा अतिरेक झाला तर ती घातकही आहे. त्याच प्रकारे निर्बंध असणं किंवा नसणं हा वेगळा विषय आहे. मात्र आपली स्वयंशिस्त असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वयंशिस्त बाळगून नवरात्रोत्सव साजरा करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
मराठा आरक्षणावरुन आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?", असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र जर माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.