Pune Crime News : पोपटाच्या शिट्यांचा त्रास, बकरीचा आवाजानंतर आता पुण्यात म्हशीच्या शेणावरुन दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील (Pune) बंड गार्डन परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना (Pune Crime)अटक केली आहे.
म्हशीने दारासमोर घाण केली याचा जाब विचारण्याऱ्याला म्हशीच्या मालकानं बेदम मारहाण केली. त्याच्या बदला घेण्यासाठी जाब विचारणाऱ्यानं देखील म्हशीच्या मालकाच्या कुटुंबीयांना मारहाण करायला सुरुवात केली. दोघांचा वाद टोकाला गेला आणि दोघांनी जोरात एकमेकांना मारहाण केली. जाब विचारणाऱ्यानं म्हशीच्या मालकाला, त्यांच्या पत्नीला आणि भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जाब विचारणारा आणि मालक या दोघांच्या डोक्याला दुखापत झाली.
तक्रारदार हर्षल मल्लाव यांच्याघरासमोर म्हशीनं घाण केली होती. त्यानंतर त्यांनी म्हैस कोणाची अशी आरडाओरड सुरु केली. म्हशीचे मालक त्या ठिकाणी पोहचले. सुरुवातीला एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जोरात मारहाण करायला सुरुवात केली. घटनास्थळी असलेल्यांनी दोन कुटुंबीयांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही एकमेकांना जुमानत नव्हते. एकमेकांवर लाकडी दांडक्यांनी आणि बुक्क्यांनी मारा केला. घडलेल्या घटनेची दोघांनी परस्पराविरोधी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हर्शल मल्लाव, राहुल काची, यश मल्लाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनेक वर्षांपासून काची वस्तीत गुरांचे मोठे गोठे आहेत. या परिसरातील लोकांना हा पारंपारिक व्यावसाय आहे. याच वस्तीत अनेकदा गुरांवरुन कुटुंबीयांमध्ये भांडणं होतात. मात्र यावेळी ही भाडणं टोकाला गेली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तातडीनं कारवाई केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
बकरीवरुन झाला होता वाद
यापुर्वी बकरीवरुन पुण्यात वाद निर्माण झाला होता. बकरी दारात बांधली आणि तिच्या आवाजाचा त्रास होत आहे. या कारणावरुन बकरी मालकानं मारहाण केली होती. हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात गेला होता. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला, हा वाद टोकाला गेला होता. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलगा खडकी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. या प्रकरणी संबधीत अल्पवयीन मुलाविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. महात्मा गांधी वसाहतीत राहणार्या एका 35 वर्षीय युवकानं खडकी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुला विरूद्ध तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलगा तक्रारदाराच्या घराच्या समोर बकरी बांधत होता. या बकरीचा आणि तिच्या आवाजाचा त्रास व्हायचा. त्यामुळे तक्रारदारानं अल्पवयीन मुलाला बकरी घरापुढे का बांधली असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली.