पुणे : राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसून येतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कारभारावर अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपकडून त्याला उत्तर देण्यात आलं. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका असा थेट इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला. त्यामुळे या दोन्ही पक्षातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत.
पुणे आणि पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आली आहे. अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानं संतापलेल्या भाजपनं अजित पवारांवर तोफ डागलीय.
Chandrakant Patil Vs Ajit Pawar : मुख्यमंत्री आमच्याकडे, चंद्रकांत पाटलांचा इशारा
अजित पवारांच्या या आरोपांवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार म्हणाले होते की तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे. त्यावेळी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं मी सांगितलं होतं. आता दमदाटीची भाषा केली जाते. त्यामुळे मी अजितदादांना सांगतो, दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे."
अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांना सोबत घेताना आपण फडणवीसांना आधीच सावध केलं होतं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तोंडसुख घेतलं.
भाजपची राक्षसी भूक पाहवत नसून इथं मोठ्या प्रमाणावर हफ्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावरून आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही आरोप करायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिला.
Pune BJP Vs Ajit Pawar : अजितदादांचा भाजपवर आरोप
भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली तसंच शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरतीय अशा विखारी शब्दात अजित पवारांनी भाजपला थेट लक्ष्य केलं होतं. तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांचं कौतुक करताना पवारांनी विकासकामं केल्याची पुष्टीही जोडली होती.
दरम्यान अजित पवारांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही जोरदार तोंडसुख घेतलंय. पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्यावर बोट ठेवताना त्यांनी मोहोळ यांच्यावर टीकेची तोफ डागली. तसेच गुंड निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी कोण मदत केली? असा प्रश्न विचारत अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले.
ही बातमी वाचा: