पुणे : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबई, पुण्यासह (pune) विविध महापालिकेत चांगलच नाराजीनाट्य पाहायला मिळालं. त्यात, पुणे शहरातील भाजप उमेदवार पूजा मोरे असतील किंवा एबी फॉर्म गिळंकृत केलेले शिवसेना शिंदे गटाचे उद्धव कांबळे असतील यांच्या विरोधाने निवडणुकीत मोठा गोंधळा उडाला होता. पुण्यातील विमान नगर भागातुन पुजा मोरे जाधव यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन नाराजी व्यक्त केल्यांऩतर त्यांनी अर्ज माघारी घेतला. पुजा मोरे आता निवडणूक लढवत नाहीत. तर, एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उद्धव कांबळे यांनी देखील अर्ज मागे घेतला. त्यामुळे, तिथे मच्छिंद्र ढवळे हे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार असणार आहेत. पण,समोरच्या उमेदवाराचा एबी फॉर्म घेऊन पळाल्यानंतरही मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज मंजूर कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडलाय. आता, निवडणूक आयोगानेच याचं उत्तर दिलंय.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 मधील शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कृतीने लक्ष वेधलं. शिंदे गटाचे उमेदवार उद्धव कांबळे यांनी एबी फॉर्म (AB Form) फाडून गिळल्याची माहिती समोर आली होती, त्यांनी निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोरच आपल्याच पक्षाच्या एका उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून गिळला. याबाबत निवडणूक अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेंना नोटीसही बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे, ज्यांनी एबी फॉर्म फाडून गिळला, त्याच कांबळेंनी आपली उमदेवारी मागे घेतली अन् मच्छिंद्र ढवळे हे अधिकृत उमेदवार झाले. पण, एबी फॉर्म काढून घेतल्यानंतरही ढवळेंचा अर्ज मंजूर कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनीच माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच एबी फॉर्म फाडून नेण्यात आल्याने तो एबी फॉर्म संबंधित उमेदवाराकडून जमा असल्याचे गृहीत धरले. त्यामुळे, मच्छिंद्र कांबळे यांचा अर्ज वैध ठरला, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांबळेंची निवडणुकीतून माघार
एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचं म्हटलं आहे. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा आरोप त्यांनी केला होता. मच्छिंद्र ढवळे यांनी एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवले, त्यामुळे राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याचं उद्धव कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, या सर्व घटनेनंतर स्वत: उद्धव कांबळे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांनी एबी फॉर्म फाडण्यामागची सर्व घटना एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. त्यांनी अर्ज फाडल्याचं कबुल केलं आहे. मात्र आपण फॉर्म खाल्ला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कांबळेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.