Continues below advertisement

पुणे : आपला पक्ष हा पुण्याच्या विकासावर बोलणारा आहे, तर त्यामुळे आपण कुणावरही टीका करायची नाही. टीका करण्याचं आपलं काम हे अजित पवार (Ajit Pawar) पूर्ण करत आहेत असा टोला उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजपला लगावला. आपल्या मित्रपक्षाला वाटत होतं आपण उमेदवार उभे करू शकणार नाही, पण काही तासातच आपण 120 उमेदवार उभे केले. आता पुण्याचा महापौर आपल्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला. उदय सामंत यांनी पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला.

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आपल्या समोर धनशक्ती आहे, आम्ही कुणावर बोलत नाही किंवा एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही अशी टीका उदय सामंत यांनी नाव न घेता भाजपवर केली.

Continues below advertisement

सगळीकडे आपलं वातावरण आहे. शिवसेनेला आशीर्वाद द्यायचं वातावरण पुण्यात आहे. उमेदवारांना माझी विनंती आहे, आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही, आपलं टीका करण्याचं काम अजित पवार पूर्ण करत आहेत. त्यामुळे आपल्याला काही बोलायची गरज नाही असं उदय सामंत म्हणाले.

Uday Samant Pune Speech : पुणेकरांचा आशीर्वाद शिवसेनेला

उदय सामंत म्हणाले की, "इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर लढत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर 16 तारखेला जो निकाल लागेल त्यावेळी महापौर बनवत असताना आपल्याला विचारात घ्यावंच लागेल अशी परिस्थिती आहे. पुणे शहर बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा."

उदय सामंत म्हणाले की, "संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. आपण घराघरांपर्यंत पोहोचू. तीन-तीन चार-चार वेळा लोकांच्या घरी जाऊ. काही नवे उमेदवार आपण दिले आहेत. 2004 मध्ये मी निवडणूक तरुण म्हणून लढलो होतो आणि त्यावेळी पराभव झाला होता. आज पाचवेळा मी आमदार झालो आहे. म्हणून जनता तरुणांच्या मागे असते."

Uday Samant On BJP : भाजपवर टीका

भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही टिकली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. पण काही लोकांचा गैरसमज होता की, आम्ही 40 देखील उमेदवार उभे करू शकणार नाही. आम्हाला वेळ कमी पडला नाहीतर आपण 165 उमेदवार उभे केले असते असा टोला सामंत यांनी भाजपला लगावला.

समोरच्या लोकांनी टीका केली तर त्याला विकासातून उत्तर द्या. ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे आहे. पुण्यात शिवसेनेची खरी ताकद काय आहे हे दाखवून द्या. पुढचे 14 दिवस अहोरात्र काम करा असं आवाहन सामंत यांनी शिवसैनिकांना केलं.

उदय सामंत म्हणाले की, "निवडणुकीचे सगळे निर्णय आपण एका तासात घेतले आहेत. पुण्यात जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष शिवसेना असेल. पण काही लोक कमी लेखत आहेत, त्यांच्यावरती बोलायला नको. आज अशी निवडणूक लढू की पाच वर्षात 165 पैकी 120 जागा आपण जिंकल्या पाहिजे."

यावर्षी महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी, कसा विकास होतो ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील. आपले मित्र पक्ष पत्रकार परिषद घेत आहेत, आपलं काम सोपं करत आहेत. पुणे ही एखाद्या पक्षाची मक्तेदारी आहे असं पुणेकर समजत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी आज गेलो, तिथे लोकांनी सांगितलं की आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.

ही बातमी वाचा: