पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातल्या पहिल्या फेरीच्या लढती सुरू झाल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशी रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. आज दुसऱ्या दिवशी सर्वांचं लक्ष असलेल्या पैलवान अभिजीत कटकेनं अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. तोही अवघ्या सहा सेकंदात. पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं अमरावतीच्या मिर्झा नदिम बेगला अवघ्या सहा सेकंदात चितपटीनं पराभूत केलं. गेल्या वेळचा उपविजेता अभिजीतनं बेगला सहा सेकंदात पराभूत करुन आक्रमक सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे मुंबई शहरच्या समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादूमियां मिलानीला चितपट करत विजय मिळवला. लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेला पराभूत करत विजय मिळवला. सागरने 19 सेकंदात विजय मिळवला.

दुसरीकडे 79 आणि 57 किलो मॅट विभागाच्या कुस्ती आज खेळवण्यात आल्या. या दोन्ही विभागात सोलापूरचे पैलवान रामचंद्र कांबळे आणि ज्योतिबा अटकळेनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. 79 किलो मॅट विभागाच्या अंतिम फेरीत रामचंद्र कांबळेनं उस्मानाबादच्या रवींद्र खैरेला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर 57 किलो विभागात ज्योतिबा अटकळेनं कोल्हापूरच्या रमेश इंगवलेवर मात केली. मूळचे कोल्हापूरचे असलेले ज्योतिबा आणि रामचंद्र हे दोघंही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आहेत. तिथं ते अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

कालपासून पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाची सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी वर्चस्व गाजवलं. 57 किलो माती विभागात आबासाहेब आटकळेनं सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम सामन्यात मूळच्या कोल्हापूरच्या पण आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान असलेल्या संतोष हिरुगडेचं आव्हान मोडीत काढलं. संतोषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तर 79 किलो माती विभागात धर्मा शिंदेनं कांस्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्र केसरीच्या 79 किलो माती विभागात उस्मानाबादच्या हणुमंत पुरीनं बाजी मारली. हणुमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. तर सागरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.