मावळ : पुण्यातल्या बैलगाडा मालकाने तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजारांचा बैल खरेदी केला आहे. राज्यातील नव्या सरकारवरील विश्वासापोटी ही खरेदी केली आहे. इतके पैसे मोजून खरेदी केलेला हा बैल शर्यतीच्या घाटावर अधिराज्य गाजवणारा आहे. पण सध्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी आहे, ती बंदी महाविकासआघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार हटवेल असा त्यांना ठाम विश्वास आहे.

कर्नाटक येथे जन्मलेला हा बैल बेरड म्हैसूर या जातीचा आहे. टोकदार शिंगं, काळ्या नख्या अन पातळ सणसणीत यष्टी ही त्याची खासियत आहे. शर्यतीच्या घाटात येताच क्षणी जशा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे फिरतात अगदी तसंच तो त्याच्या 'मॅगी' या नावाने ही प्रसिद्ध आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे, मॅगी अवघ्या काही सेकंदात घाटावर अधिराज्यही गाजवतो. त्याची ही किमया पाहून भल्याभल्यांना भुरळ पडली आहे. हरी पवार हे त्याचे मूळ मालक. आता त्याचा पत्ता हा पुण्याच्या मावळमधला झाला आहे.

मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील प्रताप जाधवांनी तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजारांना हा मॅगी खरेदी केला आहे. त्याला स्वतःच्या घरचा सदस्य बनवला आहे. तो घरी आल्यापासून त्यांच्यात जणू दिवाळीच साजरी होऊ लागली आहे. त्याची निगा देखील तशी राखली जात आहे. दूध, अंडी, चारा, भरडा अन् आंबवण असा मॅगीला खुराक पुरवला जात आहे. शिंगे टोकदार राहावीत म्हणून ती तासली जातात, रोज गरम पाण्याने अंघोळ ही घातली जाते. अगदी घरचा सदस्य असल्याप्रमाणेच मॅगीची काळजी घेतली जात आहे.

जाधव कुटुंबीयांना गेल्या तीन पिढ्यांपासून बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. म्हणूनच ते त्यांच्याकडील जनावरांची निगा स्वतःच्या मुलांप्रमाणेच राखतात. ही बाब लक्षात घेऊन ते गेली पाच वर्षे बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. गेल्या सरकारने केलेला भ्रमनिरास हे नवं सरकार करणार नाही, असा ठाम विश्वास जाधव कुटुंबियांना आहे. त्याच विश्वासापोटी त्यांनी तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयांची मॅगीवर बोली लावली.

सध्या मॅगीचा हा थाट पाहण्यासाठी पै-पाहुणे, बैलगाडा मालक-चालक अन शर्यत प्रेमींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. मॅगीसोबत काढलेले फोटो, सेल्फी अन टिकटॉकचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. साधारण शर्यतीचे बैल हे एक ते तीन लाखाच्या दरम्यान खरेदी केले जातात. मात्र महाविकासआघाडीचे सरकार येणार याची निश्चिती होताच, जाधव कुटुंबीयांनी अधिकचे तेरा लाख मोजले अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या सरकारकडे जनतेतून आलेली ही पहिलीच मागणी आहे. बैलगाडा मालकांनी मोठ्या विश्वासाने केलेल्या या मागणीला हे सरकार गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्वाचं राहील.