Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामधे फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यातील तीन व्यक्ती पूल पाडण्याचे काम करणाऱ्या इडिफाई, इंजिनियरिंग (Edifice engineering) कंपनीचे अधिकारी असतील. तर एक पोलिस अधिकारी असेल. पूल पाडण्याच्या आधी 200 मीटरच्या अंतरावरील सर्वांना बाजूला हटवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
स्फोट झाल्यावर धूर खाली बसण्यास 15 मिनिटे लागणार आहे. त्यानंतर स्फोटाच्या ठिकाणी कोणतंही जिवंत स्फोटक राहणार नाही याची पडताळणी केली जाईल. मध्यरात्री अडीच वाजता राडारोडा हटवण्यात सुरुवात करण्यात येईल. सकाळी आठ वाजेपर्यंत हा राडारोडा हटवण्यात येईल. शहराच्या मध्यभागी हा स्फोट होणार असल्याने राडारोडा लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या राडारोड्याच्या पार्टीकलचा जास्त त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
या मार्गावरची वाहतूक वेगळ्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. साताऱ्याला जाणाऱ्या नागरिकांनी सिंहगड रोड, कोथरुड, वारजे या मार्गाचा वापर करावा. मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर या कालावधीत वडगावच्या नवले पुलापासून वाहनांना पुणे शहरात प्रवेश करावा लागेल आणि त्या वाहनांना पाषाण किंवा बाणेर मार्गे महामार्गाला जाता येणार आहे. ज्या वाहनांना मुंबईहून सातारला जायचं असेल त्यांना या कालावधीत वाकड- बाणेर मार्गे पुणे शहरात यावं लागेल आणि वडगावचा नवले पुल किंवा कात्रज चौक मार्गे महामार्गाकडे जाता येणार आहे.