Pune Crime News: 20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात सुटका केली. ही घटना शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री घडली होती. सहा तासात सुटका करुन पिंपरी पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी ज्ञानेश्वर किसन चव्हाण (23), लखन किसन चव्हाण (26) आणि लक्ष्मण डोंगरे (22) अशी अटक केलेल्यांची ओळख पटवली असून अपहरणप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील असून ते हिंजवडी परिसरात राहतात. मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या आणि पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांना 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा फोन आला. हिंजवडी फेज 2 येथील स्वराज पेट्रोल पंपाजवळून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्यात आले. त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी शिक्रापूरजवळ आरोपींचा तपास केला. ते अहमदनगरच्या दिशेने जात होते, मात्र त्यांची गाडी बिघडल्याने दुरुस्तीसाठी दिली होती. त्यांना अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन धारदार शस्त्रे, पाच मोबाईल फोन तसंच कार जप्त केली आहे.
आरोपी फिर्यादीचा स्टॉल होता. या स्टॉलवर हे दोघे मोफत खात असत. अनेकदा त्यांनी धमकी दिली होती. मात्र याकडे तक्रारदाराने दुर्लक्ष केलं. जेव्हा तिने पैशाची मागणी केली तेव्हा त्यांनी तिच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली. तिने यापूर्वी त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या दिवशीसुद्धा असंच घडलं. खाण्याचे पैसे मागितले असता. ते दोघे चिडले. आरडाओरड करु लागले. अनेकदा धमकी दिली होती मात्र अपहरण करतील असं तक्रारदाराला वाटलं नाही. मात्र शेवट त्या दोघांनी मुलाचं अपहरण केलं, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.