Pune electricity crime News: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या उड्डाण पथकाने रावेत येथे वीजचोरी उघडकीस आणली आहे. एका बिल्डरने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटरमध्ये फेरफार केला होता. प्राथमिक चौकशीत एक- दोन नाही तर 98 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचं समोर आलं आहे. २ लाख ४ हजार २९२ युनिट वीज वापरली गेली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांतर्गत रावेत पोलिस ठाण्यात बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी खिलुमन ओचनी यांच्या जागेवर गेल्या 18 महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. इमारतीच्या बांधकामासाठी वीज मीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फेरफार करून वीजचोरी करण्यात आली. ओचानी यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135, 136, 137 आणि 138 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती
महावितरण विभागाकडून सांगण्यात आली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उड्डाण पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
पुण्यात आज (5 जुलै) दोन मोठ्या चोरीचा छडा लागला आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घरातून रोकड आणि दागिने चोरणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. 34 वर्षीय मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी, 29 वर्षीय जुनैद रिझवान सैफ आणि 31 वर्षीय हैदर कल्लू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोख रक्कम आणि दागिने चोरणाऱ्या अन्सारी याला गुन्हे शाखेने अटक केली, तर अन्य दोन आरोपींना पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली.
20 जून रोजी बिबवेवाडी येथील सोबा सवेरा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमधून 1.4 लाख रुपये रोख आणि 600 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि सोसायटी सदस्यांच्या चौकशीच्या मदतीने गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या शोध शाखेच्या पथकाने अन्सारी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली. अन्सारीवर 2019 पूर्वी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान आम्हाला कळले की जुनैद आणि हैदरने अन्सारीला दागिने चोरण्यात आणि लपविण्यास मदत केली. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली. आम्ही चोरीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त (झोन 5) नम्रता पाटील यांनी दिली.