सतीश शेट्टी हत्या प्रकरणः तत्कालीन पोलीस अधिकारी आंधळकर, कवठाळेंना जामीन
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 20 Jul 2016 01:04 PM (IST)
पुणेः माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नामदेव सुखदेव कवठाळे यांना जामीन मिळाला आहे. पुण्यातील सत्र न्यायालयानं 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे सीबीआयच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आंधळकर आणि कवठाळे दोघेही पुण्यामध्ये न्यायालयीन कोठडीत होते. सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी तळेगाव दाभाडे इथं भरदिवसा तीक्ष्ण शस्त्रानं वार करून हत्या केली करण्यात आली होती. शेट्टी प्रकरणाचा तपास सुरुवातीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे होता. त्यावेळी तपासात आंधळकर आणि कवठाळे यांनी प्रमुख आरोपींना वाचविण्यासाठी मदत केली तसंच बनावट पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तयार केल्याचा आरोप आहे. मात्र आता त्यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.