मुळशी (पुणे) : पौड येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये अवैध शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांसाठी लावलेले गावठी बॉम्ब जप्त करुन ठेवण्यात आले होते. बुधवार पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान या बॉम्बचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात कार्यालयाच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पौड येथील बारमुख यांच्या इमारतीत ताम्हिणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. ताम्हिणी अभयारण्य परिसराचे कामकाज येथून चालते. काही दिवसांपूर्वी मुळशी परिसरातील जंगलातून शिकाऱ्यांनी रानडुक्कर इत्यादी प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले गावठी बॉम्ब जप्त करुन कार्यालयात ठेवले होते. बुधवारी पहाटे या जप्त करुन ठेवलेल्या गावठी बॉम्बचा मोठा स्फोट झाला.
या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कार्यालयाचे दरवाजे, खिडक्या तुटून पडले. खांबांना तडे गेले आहेत, तर बाजूची भिंत पडली, टेबल, कपाटे इत्यादी कार्यालयीन सामान इतरत्र पसरलं आहे. कार्यालय ज्या ठिकाणी आहे तेथे नागरी वस्ती आहे. मात्र पहाटेच्या वेळी स्फोट झाल्याने कार्यालयात किंवा आसपास कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी, इतर नुकसान झालं नाही.
VIDEO | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा