Pune Chandani Chowk : पुण्यातील बावधन वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणच्या रस्त्याच्या बाजूचे खडक फोडण्याचे काम सुरु असल्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 पासून 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:30 वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
असे असतील पर्यायी मार्ग-
बावधन, हिंजवडी, देहूरोड, वाकड वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोल नाक्यापासून चांदणी चौकाकडे येण्यास बंदी करण्यात करण्यात आली आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सूस खिंड येथून चांदणी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मुंबईकडून पुणे साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरता पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने उर्से टोलनाका येथून सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई-पुणे हायवेमार्गे भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा पुणे मार्गे जातील.
वाकड चौकातून डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ मार्गे जाता येईल. भुमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन, औंध, शिवाजीनगर मार्गे, किवळे चौकातून रावेत, डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध, शिवाजीनगर मार्गे जाता येणार आहे. राधा चौकातून डावीकडे वळून बाणेर रोडने पुणे विद्यापीठ चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपआयुक्त आंनद भोईटे यांनी कळवले आहे.
कालच्या दिवसाच्या ब्लॉकमुळे त्रास
काल देखील एका बाजूची टेकडी फोडण्यासाठी भर दुपारी ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र पूर्वसूचना न देता हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांना या ब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागला होता. यात काही शाळेच्या बस देखील अडकल्या होत्या. दीड ते दोन तास बस जागेवर उभी असल्याने विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही झाला. शालेय बस असल्याने मुलांनी रडारड केली होती. मुलांची शाळेतून घरी येण्याची वेळ चुकल्याने अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पालकांनी अनेकांकडून फोनवरुन माहिती घेतली त्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला. मात्र काहीही न सांगता अशाप्रकारचा ब्लॉक घेतल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आज हा ब्लॉक दिवसा न घेता रात्री घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.