पुणे : पुण्यात बिबवेवाडी परिसरात एका 13 वर्षाच्या मुलाला त्याच्याच मित्रांनी सिगरेट ओढण्यास देऊन, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी तब्बल 7 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
दिवाळीपासून हा सर्व प्रकार सुरु होता. आईला घरातील दागिने न सापडल्यामुळे वडिलांनी विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन सोनारांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
रेवणसिद्ध शिलवंत आणि आदित्य वांद्रे, अशी अटक करण्यात आलेल्या सोनारांची नावे असून, त्यांनी दोघा अल्पवयीन मुलांकडून ते दागिने विकत घेतले आहेत.
मुलाचे वडील वसतिगृह चालवतात. त्यांना आई-वडील, पत्नी व दोन मुले, असा त्यांचा कुटुंब आहे. पीडित हा त्यांचा लहान मुलगा आहे. तर मोठा मुलगा हा बारावीत शिकत आहे.
दरम्यान, 18 जानेवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या मलाचा बारशाचा कार्यक्रम होता. यावेळी पीडित मुलाच्या आईने घरातील पोटमोळ्यावरील कापाटात ठेवलेले दागिने काढण्यासाठी पाहिले असता तेथे दागिने मिळाले नाही. त्यानंतर घरात इतरत्र शोधूनही दागिने न मिळाल्याने वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना खडसावून विचारले असता. लहान मुलगा पीडित हा एकदम रडू लागला. वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन रडण्याचे कारण विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला.
त्याच्या दोन मित्रांनी आणि आरोपी वांद्रे याने त्याला सिगरेट ओढायचे शिकवून सिगरेट ओढत असताना त्याची मोबाईलवर व्हिडिओ क्लिप बनवली. त्यानंतर त्याला पैशासाठी ब्लॅकमेल केले. पैसे न दिल्यास हा व्हिडिओ तुझ्या वडिलांना दाखवू तसेच सोशल मीडियावर अपलोड करु अशी धमकी दिली.
पोलिसांनी तपास केला असता 7 लाख 55 हजार रुपयांचा 20 तोळे ऐवज या मुलाने भीतीपोटी दोन्ही मित्रांना दिला असल्याचं समोर आलं. पोलिसांनी यातील बऱ्यापैकी ऐवज हस्तगत केला आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलाशी सवांद वाढवून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.