पुणे : महापालिकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या लॉटरीत सत्ताधारी भाजपला झटका बसला आहे. विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे चार सदस्य पुणे महापालिकेच्या स्थायी समितीतून बाहेर पडले आहेत.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे आठ सदस्य फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत, तर उरलेले आठ सदस्य आणखी एक वर्ष स्थायी समितीमध्ये राहणार आहेत.

16 पैकी कोणत्या 8 सदस्यांना निवृत्त करायचं यासाठी आज महापालिकेत चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य सभागृहात निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांसाठी चिठ्ठ्या टाकून लॉटरी काढण्यात आली.

यामध्ये भाजपच्या चार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आणि काँग्रेस आणि शिवसेना यांच्या प्रत्येकी एका सदस्याच्या नावच्या चिठ्ठ्या निघाल्या. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचाही यामध्ये समावेश आहे. स्थायी समितीमध्ये सध्या भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

लॉटरीमध्ये नावाची चिठ्ठी निघालेल्या सदस्यांची नावं :

  • मुरलीधर मोहोळ- भाजप

  • हरिदास चरवड - भाजप

  • अनिल टिंगरे -  भाजप

  • योगेश समेळ - भाजप

  • नाना भानगिरे - शिवसेना

  • रेखा टिंगरे - राष्ट्रवादी काँग्रेस

  • प्रिया गदादे - राष्ट्रवादी

  • अविनाश बागवे - काँग्रेस