बारामती : माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं भाषण सुरु असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार भाषण करत होते, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारही उपस्थित होते.

बारामतीत आज नगरपरिषदेच्या वाहनतळ व गणेश मार्केट उद्घाटन कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना काळे झेंडे दाखवले.

प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अमर साबळे यांचे नाव पत्रिकेत न टाकल्याने भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे शरद पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच काळे झेंडे दाखवत निषेध केला.

काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.