पुणे : राज्यभर सुरू असलेल्या बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यावेळी पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क आपल्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट दिली.

एकीकडे बसच्या संपानं त्रस्त असलेल्या प्रवाशांना सुप्रिया सुळेंनी दिलेल्या लिफ्टमुळे आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी प्रवाशांनी एसटी संपाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

आज सकाळच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांशीही त्यांनी बातचीत केली. त्यानंतर काही प्रवाशांना त्यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली.

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

कोकणच्या ग्रामीण भागातून शहरात यायचे महत्वाचे माध्यम एसटी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोकणच्या ग्रामीण भागात कालरात्री वस्ती करिता आलेल्या गाड्या शहरात दाखल झाल्या, पण आज सकाळपासून एकही बस रत्नागिरी स्थानकातून सुटलेली नाही. जे चाकरमानी मोठ्या शहरातून आज दिवाळीनिमित्ताने कोकणात दाखल झाले आहेत, त्यांना शहरातून आपल्या गावात पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नव्हत्या .

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास

याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

 

किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या?

  • राज्यात एसटी कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.

  • दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.


एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.

संबधित बातम्या :

LIVE: एसटीचा संप, दिवाळीला गावी जाणारे प्रवासी अडकले