पुणे : सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या एका निनावी पोस्टमुळे पुणे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांची छेड काढण्यात आल्याचा आरोप एका महिला पदाधिकाऱ्याने केला. या आरोपानंतर पुण्यातील भाजपचा एकही नेता तोंड उघडण्यास तयार नाही. मात्र त्यामुळे याप्रकरणी संशय आणखीनच बळावतो आहे.


चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे मंगळवारी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र स्वारगेट भागातील शिवशंकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात छेडछाड झाल्याचा आरोप भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केला आणि एकच खळबळ उडाली. या महिलेने लिहलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

महिलेची फेसबुक पोस्ट

नमस्कार, अतिशय संतापाने मी हा मेसेज ग्रुपवर टाकतीये. कालच्या शिवशंकर सभागृहात आमच्या बाबतीत जो फालतु प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. काल सभागृहात अध्यक्ष मा. श्री चंद्रकांत दादांना भेटण्यासाठी आम्ही उभे होतो. तेव्हा गर्दीत कुणीतरी तरी माझा पदर इतक्या जोरात मुद्दाम खेचला. अतिशय संतापजनक बाब आहे ही. माझ्या बरोबर असलेल्या दुसऱ्या महिला पदाधिकारीला जोरात चिमटा घेतला. गर्दीत आमच्या चेहरे लक्षात आले नाही. भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे कि होता असा प्रश्न काल मनात आला. जर महिलांची सुरक्षितता इथे जपली नाही तर काय उपयोग पक्षातील पुरुष पदाधिकाऱ्यांचा. काल आमच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मेसेज टाकतीये. हा विषय आपले आमदार व सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यत जावा हे महत्त्वाचे. जर आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे. कारण सगळ्या महिला प्रामाणिकपणे काम करतात कशाचीही अपेक्षा न ठेवता. अतिशय खेद वाटतो मला काल जो प्रकार आमच्या बाबतीत झाला तो आपल्याच मतदारसंघात.

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित महिलेने पक्षच्या नेत्यांकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे पत्रकार आहेत उगाच पक्षाची बदनामी होईल, असं म्हणत नेत्यांनी त्या महिलेलाच गप्प बसवलं. त्यानंतर या महिलेने हा प्रकार पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. पण तिथंही दाद न मिळाल्याने अखेर त्या महिलेने सोशल मीडियाचा आधार घेतला .

भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले, जिथं हा कार्यक्रम झाला त्या भागातील आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपच्या पुण्यातील अन्य नेत्यांनीही दिवसभर फोन उचलणं टाळलं. संबंधित महिलेने तिचे नाव उघड केलेलं नसलं तरी भाजप नेत्यांसाठी हे आरोप फेटाळणंही अवघड झालं आहे. सत्काराचा कार्यक्रम संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी जी गर्दी उसळली त्यामध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप होतो आहे. इथे सर्व भाजपचेच कार्यकर्ते उपस्थित असल्यानं बाहेरच्या कुणाकडे बोट दाखवण्याची सोयही उरलेली नाही. याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी चारित्र्य पाहूनच भाजपमध्ये प्रवेश दिला जातो असा दावा केला. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी पावणेदोन कोटी मतं मिळवावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्या मतांचं नंतर बघता येईल पण आमच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न पक्षातील महिला पदाधिकारी पार्टी विदिन डिफरंन्स असं म्हणवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारला जातोय.