पुणे: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (BJP President JP Nadda) पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे.पी.नड्डा दाखल झाले. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली. देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर जावं लागले. दरम्यान पाऊस सुरु असल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  हे पुण्यातील (Pune Fire Incident) एका मंडळात गणपतीची आरती करत असताना अचानक आग लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना बाहेर काढलं. त्या संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आग लागल्यानंतर पोलिसांनी जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर काढल्याचं दिसून येतंय. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. साने गुरूजी तरूण मंडळामध्ये ते आरती करत असताना मंडळाच्या कळसाला आग लागली. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. 


पाऊस सुरू झाला आणि आग विझली


मंडळाच्या कळसाला आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जेपी नड्डा यांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाल्याने आग लगेच विझली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.


या मंडळातून बाहेर पडल्यानंतर जेपी नड्डा हे कोथरूडच्या दिशेने रवाना झाले. कोथरूडमध्ये ते काही गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. 


जेपी नड्डा मुंबई आणि पुणे दौऱ्यावर 


गणेशोत्सवानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डांनी मुंबई आणि पुण्याचा दौरा केला. जे.पी नड्डांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनानं केली. 


सकाळी 11.30 च्या सुमारास जे. पी नड्डा मुंबईत दाखल झाले. त्यानंतर नड्डा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर नड्डांनी फडणवीसांच्या शासकीय निवसस्थानी गणरायचं दर्शन घेतलं. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक तयारीबाबत जेपी नड्डा यांनी बैठकीतून आढावा घेतला.


याआधीच दोन दिवसांपूर्वी अमित शाहांनीदेखील मुंबई दौऱ्यादरम्यान आढावा घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षावरही विराजमान झालेल्या गणरायाचं जे.पी. नड्डा यांनी घेतलं आणि ते पुण्याकडे रवाना झाले.


पुण्यात पोहोचल्यानंतर नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाला हजेरी लावून ते पुन्हा दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले.