पिंपरी-चिंचवड : पुण्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला. या वादामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिकेची सोडत कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. भाजप आणि राष्ट्रवादीमधील श्रेयवादाच्या राजकारणात गोरगरीब अर्जदारांची गळचेपी झाली. महापालिकेच्या पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सोडत होणार असल्याचं नमूद होतं. मात्र भाजपने प्रत्यक्षात अजित पवारांना निमंत्रण दिलंच नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने निदर्शने केली. ज्या रामकृष्ण मोरे सभागृहात ही सोडत होणार होती, त्याच्या गेटवर काळे झेंडे घेऊन राष्ट्रवादीने ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चंद्रकांत पाटलांसाठी मार्ग खुला केला.


एकीकडे राष्ट्रवादीची आगपाखड ओखल्याचं आणि दुसरीकडे महापालिका प्रशासनाने कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं कारण भाजपने पुढे केलं आणि सोडतीचा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. पण गेली चार वर्षे या सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या अर्जदारांना आजही पाच तास ताटकळत बसून रिकाम्या हाती परतावं लागलं. भाजप आणि राष्ट्रवादीमधील श्रेयाचं राजकारणाने आम्हा गरिबांच्या जीवाशी खेळणारं ठरतंय. त्यांचं हे राजकारण आमच्या स्वप्नांचा चुराडा करतंय. इतक्या अपेक्षेने आम्ही इथं आलो होतो पण डोळ्यात अश्रू घेऊन आम्हाला परतावं लागतंय, अशी खंत अर्जदारांनी व्यक्त केली.


सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्याची ओढवलेली नामुष्की दूर करण्यासाठी भाजपनेही आंदोलनाचं अस्त्र उगारले. पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत आयुक्तांच्या दालनाबाहेर त्यांनी ठिय्या मांडला. महापालिकेच्याया सत्तेत असतानाही महापौर माई ढोरे यांच्यासह नगरसेविकांवर ही वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरूनच आयुक्तांनी ही खेळी केल्याचा भाजपने यावेळी आरोप केला. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला पंतप्रधान आवास योजनेचं श्रेय मिळावं म्हणूनच प्रशासनाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. भाजपला बदनाम करण्याचं प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपने दिला.


भविष्यात सदनिकांची सोडत ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. तेव्हा राजशिष्टाचाराचे पालनही केली जाईल. आजच्या सारखा गोंधळ होणार नाही, तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टनसिंग पाळलं जाईल असं म्हणत आयुक्त श्रावण हर्डीकर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 2022मध्ये होणाऱ्या महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप आणि राष्ट्रवादी कडून श्रेयवादाच राजकारण सुरुये. ते त्यांनी करावं देखील. पण गोरगरिबांच्या भावनेशी खेळणारं हे दोन्ही पक्षाचं राजकारण नक्कीच लाजिरवाणे आहे.


,