पुणे : युवा नेते पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पार्थ यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यामध्ये लगावला. राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते बोलले असतील असेही गिरीश बापट यांनी म्हटलं.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची केस सीबीआयकडे गेली आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी सुरू होईल. यामध्ये कोण आहे, कोण नाही, हे सत्य बाहेर येईल. सुशांत सिंह प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नाही. सत्य लोकांसमोर येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल आमच्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतरच सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे आता लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही गिरीश बापट यांनी म्हटलं.


शरद पवार काय म्हणाले होते?


पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."


संबंधित बातम्या