पुणे: खंडणीचा गुन्हा असलेले भाजपचे पुण्यातील हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी तक्रार देऊ नये यासाठी तक्रारदार रवींद्र बऱ्हाटे यांच्यापुढे लोटांगण घालत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका केबल कंपनीकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र तो गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यावर रान उठवलं. आता खुद्द आमदार टिळेकरच त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याचे पाय धरत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खंडणीचं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.


बऱ्हाटे यांचे असे पाय धरूनही टिळेकर यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. उलट तक्रारदाराचे पाय धरत असल्याचा हा व्हिडीओ समोर आल्याने टिळेकर यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांना आणखीनच बळ मिळालंय. हडपसर भागात फायबर ऑप्टिक टाकण्यासाठी आमदार टिळेकर यांनी व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा टिळेकर यांच्यावर आरोप आहे.

व्हिजन इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गणगोटे आणि टिळेकर यांच्यातील मोबाईल कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आमदार टिळेकर यांच्यावर 12 ऑक्टोबरला खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याआधी अनेक दिवस आमदार टिळेकर त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते.

त्याचाच भाग म्हणून आमदार टिळेकर नऊ सप्टेंबरला रवींद्र बऱ्हाटे यांना भेटायला एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलच्या लॉबीमध्ये आमदार टिळेकर तक्रारदार रवींद्र बऱ्हाटे यांना काहीतरी समजावून सांगताना आणि त्यानंतर अचानक त्यांचे पाय धरताना दिसतायत.

आमदार टिळेकर यांनी देखील ते बऱ्हाटे यांना भेटल्याचा आणि बऱ्हाटे यांचे पाय धरल्याचं मान्य केलंय. मात्र आपण बऱ्हाटे यांना समजावण्यासाठी गेलो होतो असा आमदार टिळेकर यांचा दावा आहे.बऱ्हाटे हे व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा या कंपनीचे एरिया मॅनेजर म्हणून काम करतात.

टिळेकर यांनी पाय धरल्यानंतरही बऱ्हाटे यांनी टिळेकरांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आणि त्यांच्याकडे असलेले पुरावेही पोलिसांकडे सोपवलेत. 12ऑक्टोबरला आमदार टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हा नोंद करणारे कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गायकवाड यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे त्यांना निरोप देताना भावुक झालेल्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या कार्मचाऱ्यांचा व्हिडिओही त्यानंतर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आमदार टिळेकर यांच्याविरुद्धच्या आरोपांना बळ मिळाले आहे, असं रवींद्र बऱ्हाटे यांचं म्हणणं आहे.