Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. पंतप्रधानांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत, असे शरद पवार म्हणालेत. शरद पवारांच्या या टीकेला भाजपने उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हटलंय भाजपने
आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? असा सवाल भाजपने केला आहे. आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, 'मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही'
असा टोला भाजपने पवारांना लगावला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचे कारण नाही. ते मेट्रो सुरू करत आहेत. मला माहिती नाही. महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या रस्त्याने मी देखील गेलो. आमचे काही सहकारी होते. माझ्या लक्षात आलं की हे मेट्रोचं काम काही सगळं झालेलं नाही. मला नुसतं दाखवलं. काम झालं नाही तरी उद्घाटन होत असल्याचे शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.
दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या: