पिंपर-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शाम लांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा महापौर विराजमान झाला.
पिंपरी-चिंचवड आजवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, यंदाच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी सर्वाधिक म्हणजे 77 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच महापौर बसणार हे नक्की होतं. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल केल्याने निवड़णुकीची औपचारिकता पार पडणार होती. मतदानापूर्वी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे नितीन काळजे महापौरपदी विराजमान झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकहाती सत्ता काबीज केलेल्या भाजपच्या पहिल्या महापौरपदी नितीन काळजे यांची वर्णी लागली आहे. नितीन काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात.
नितीन काळजे यांना महापौरपदाची उमेदवारी मिळाल्याने पिपंरी-चिंचवड शहर भाजपमधील जगताप गट आणि निष्ठावानांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती. मात्र, भाजपचा पहिला महापौर पिंपरी-चिंचवडमध्ये बसणार असल्याने उत्साहाचं वातावरणही दिसलं.