पुणे : पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या निर्णयानंतर भाजपने याला विरोध केला आहे.
वारकऱ्यांना कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सगळ्याच गोष्टींना परवानगी आणि वारीला मात्र विरोध हे न कळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार यांनी देखील आजारातून उठल्यावर हॉटेल चालकांची काळजी केली, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही : अजित पवार
सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही. त्यांना राजकारण करायचं असेल तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. परंपरा टिकली पाहिजे पण कोरोनाने लोक ग्रासले नाही पाहिजे याचा सरकारने विचार केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पायी पालखी जाणार म्हणून वारकरी उत्साहात बाहेर पडतील म्हणून तशी परवानगी दिली नाही. आम्हाला तशी परवानगी द्यायला बरोबर वाटत नाही, पण कोरोना वाढला नाही पाहिजे. नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. परंपरा टिकवण्यासाठी मधला मार्ग काढला असल्याचे उपमुख्यमंत्री सांगितले. दोन बसमध्ये 30-30 वारकऱ्यांना जाता येईल. एका पालखीसाठी दोन बस असतील, अशीही माहिती त्यांनी दिली.
भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक
निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावल्यानं भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली असून भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांची ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे मुघलांचे सरकार असून महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. ब्रिटीश, मुघलांच्या काळात ही पायी वारीची परंपरा खंडित झाली नाही ती या सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, तो खपवून घेणार नाही. निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर वारकरी संप्रदाय ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
नियमावलीमुळे पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा नाराज
मानाच्या पालखीत पैठणच्या पालखीचे स्थान आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम बाबत पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पायी पालखी जाणे हा वारकऱ्यांचा मान आहे, जीव आहे. त्यामुळे किमान पाच तरी लोकांना पायी पालखी नेऊ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचे नियम आम्हाला मान्य आहे. मात्र, जर पाच लोकांना पायी जाऊ दिलं तर वारकऱ्यांवर उपकार होतील असं महाराजाचे म्हणणे आहे. त्यामुळं शासनाने याचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केलीये.
मानाच्या 10 पालख्या :
1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
2. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
3. संत सोपान काका महाराज (सासवड)
4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
5. संत तुकाराम महाराज (देहू)
6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)
7. संत एकनाथ महाराज (पैठण)
8. रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
9. संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
10. संत चांगटेश्वर महाराज (सासवड)
दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बस आणि भाविकांची संख्या दुप्पट करीत वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकत्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे.