पुणे : कथित नक्षलसंबंधांवरुन अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.  याप्रकरणी अटकेत असलेले सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं.


या पाचही जणांचे 28 ऑगस्टला नव्याने अटक करण्यात आलेल्या लोकांशी संपर्क असल्याची माहिती पुणे पोलिसांसमोर आली आहे. त्या अनुषंगाने तपास करायचा आहे, असा दावा यावेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. त्यानंतर कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

सरकारी वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

''अटकेतील पाचही जण बंदी असलेल्या एका संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचं आढळून आलंय. त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवण्यात आले आहेत. त्याचबरोबर जप्त करण्यात आलेले पेनड्राईव, सीडीआर यांचा फॉरेन्सिकचा अहवाल अजून यायचा आहे. त्याचबरोबर देशातील प्रस्थापित व्यवस्थेविरोधात फक्त महाराष्ट्रात नाही, तर इतर राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमिनार घेतले. या सेमिनारला निधी पुरवण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय, त्यांची ओळख पटवायची आहे. जगातील नक्षलवादापेक्षा शहरातील नक्षलवाद गंभीर आहे,'' असा युक्तिवाद यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रस्थापित झाल्याने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतीत झाला तसा घातपात करण्याचा पत्र व्यवहार झालाय. त्यामुळे या कटाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असून फॉरेन्सिकचा अहवाल अजून यायचा आहे. अनेक जप्त मुद्देमालात पासवर्ड असल्याने तपासात मर्यादा पडतात.  त्यामुळे अजून 90 दिवस मुदतवाढ द्यावी,'' अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली.

दरम्यान, सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन यांच्या जामीन अर्जावर सहा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याचदिवशी आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहातून दुसरीकडे हलवण्याबाबतच्या अर्जावरही सुनावणी होईल. येरवडा जेलमध्ये सध्या साडे पाच हजार आरोपी आहेत, मात्र या जेलची क्षमता 2300  आहे. त्यामुळे या आरोपींना इतरत्र हलवण्यात यावं, यासाठी कोर्टाला अर्ज करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली होती. या परिषदेत जे लोक सहभागी झाले होते, त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी छापे मारले. अटक केलेले सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असा पोलिसांचा दावा आहे.

अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध, पोलिसांचा दावा

''अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तशी हजारो पत्रं मिळाली आहेत. त्या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारांचा उल्लेख आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. इतकंच नाही तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही पोलिसांनी केला.

लेखक वरवर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचंही परमवीर सिंह यांनी म्हटलं होतं.

या पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच काही कम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले असून, या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणं, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचंही सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

पत्रं वाचून दाखवली

या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेली पत्रं वाचून दाखवली. यामध्ये कॉम्रेड सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, रोना विल्सन यांच्या पत्रांचा समावेश होता. या पत्रांमध्ये नक्षलवादी चळवळीसाठी कसा प्लॅन करता येईल, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी, शस्त्र याबाबतचा उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध, पोलिसांचा दावा

नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस

नक्षल कनेक्शन : धाडी, अटक ते नजरकैद, आतापर्यंत काय काय झालं?