Bhimashankar Jyotirlinga : बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराची जागा आपल्या खाजगी मालकीची असल्याचा दावा संतोष पटवा नावाच्या व्यक्तीने केलाय.  मात्र मंदिर देवस्थानाच्या विश्वस्तांच्या मते पटवा यांची जागा मंदिराच्या शेजारी आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये देखील मंदिर आणि भोवतालची सात एकर जागा सरकारी मालकीची असल्याची नोंद आहे. मग संतोष पटवा कोणाच्या पाठबळावर भीमाशंकर मंदिरावर दावा करतायत हा प्रश्न उपस्थित होतोय. 


अनादी काळापासून भीमाशंकराच हे मंदिर शिवभक्तांच श्रद्धास्थान आहे.  संपूर्ण देशातील शिवभक्त इथे दर्शनासाठी येत असतात.  मात्र हे मंदिर आपल्या खाजगी मालकीच असल्याचा दावा संतोष पटवा नावाच्या व्यक्तीने केल्याचा दावा केल्याने खळबळ उडालीय.  ही जागा मंदिराचे विश्वस्त सुखदेव कोडीलकर यांच्याकडून आपले काका शांतीभाई पटवा यांनी विकत घेतल्याचा पटवा यांचा दावा आहे.  त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतलीय.  मात्र मंदिर विश्वस्तांच्या मते पटवा यांची 36 एकर जागा मंदिराच्या बाजूला असून मंदिराची नाही. सरकारी खात्यातील नोंदीदेखीवल हेच सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


जागेचा वाद जुनाच


मंदिर देवस्थान आणि पटवा यांच्यातील जागेचा हा वाद जुना आहे. मंदिराच्या भोवतालची 36 एकर जागा आधी सुखदेव कोडीलकर या पुजार्‍याच्या मालकीची होती. मात्र हा पुजारी आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी पैशांसाठी ती गहाण ठेवली. ही संधी साधून पटवांनी मंदिराच्या भोवतालची 36 एकर जागा विकत घेतली. मात्र, आता शेजारच्या 36 एकर जागेबरोबरच मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे ती जागाही आपलची असल्याचा पटवा दावा करत आहेत. मंदिर देवस्थानकडून याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. 
 
भीमाशंकराच हे मंदिर ज्या ठिकाणी आहे, त्याच्या भोवताली इथल्या पुजार्‍यांची लहान- लहान घरे आहेत.  भूमापन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या नकाशात हे मंदिर आणि पुजार्‍यांची घरे स्पष्टपणे सरकारी जागेवर असल्याच दर्शविण्यात आलं आहे. ज्या सात एकर जागेबरोबरच पटवा यांच्या ताब्यातील 36 एकर जागा देखील पुन्हा मंदिर देवस्थानच्या ताब्यात घेण्याचा देवस्थानचा कायदेशीर प्रयत्न सुरु आहे. 
 


न्यायालयात वाद सुरू असताना दावा का?


मंदिर देवस्थान आणि पटवा यांच्यातील मंदिराभोवतीच्या 36 एकर जागेचा वाद न्यायालयात सुरु असतानाच पटवा यांनी थेट मंदिराच्या जागेवरच दावा का केला असावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.  हा दावा करून सरकारकडून आपली 36 जागा अधिग्रहित केली जावी आणि त्याचा मोबदला अपल्याला मिळावा असा पटवा यांचा उद्देश आहे का? अशी चर्चा सुरू आहे.  हा सगळा परिसर शेकरू या प्राण्यामुळे संरक्षित वनामधे मोडत असल्याने इथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. मग थेट मंदिरावरच दावा करुन सरकारकडून पैसै लाटण्याचा पटवा यांचा प्रयत्न यातून दिसून येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.  या पटवांच्या मागे कोण शक्तीशाली नेता आहे का असा प्रश्नही या निमित्तानं विचारला जात आहे.