पुणे : पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन शिवसेनेनं सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं संजय राऊत म्हणाले.
आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू- राऊत
संजय राऊत म्हणाले की, भोसरी विधानसभेत शिवसेनेचा एक ही नगरसेवक निवडून आला नाही, ही मोठी खंत आहे. म्हणून भोसरीतून शिवसेनेला कामाची सुरुवात करायला हवी, असं ते म्हणाले. येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसं राज्यात आहोत. आपण इतकीच माफक अपेक्षा करतोय. राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौर पदाची आपण ईच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकलं, असंही राऊत म्हणाले. आता संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, प्रभाग चारचा होता म्हणून आपल्याला फटका बसला. पण भाजप सत्तेत का आली? त्यांना याचा का फायदा झाला, याचा आपण विचार करायला हवा. मुंबईत जर आपला बोलबाला आहे पण त्या लगतच्या पुणे-पिंपरीत का होत नाही. ही खंत आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन घासून आले, मग आपण ठासून येऊ. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला की कोथरूडमध्ये आला आपल्याला काही फरक पडत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनी आपल्याला सगळ्या पदावर बसवलं. या पक्षात निष्ठेला खूप महत्व आहे. मंचावर बसलेल्या प्रत्येकाला पदं मिळाली आहेत, पण समोर बसलेल्यांना एक ही पद नाही मिळत, ते आहेत म्हणून आपण आहोत. मी दिल्लीतला पत्ता काय सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर संजय राऊत राहतो. ही देण बाळासाहेबांची आहे. मला म्हणून तर दिल्लीत खूप ओळखतात. आता हेच मोदी साहेबांना विचारलं तर कदाचित ते म्हणतील मी खासदार संजय राऊतांच्या समोर राहतो, असं मिश्किलपणे राऊत म्हणाले.
परवानगी नसतानाही पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा
पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरी देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा हा मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेने पिंपरी चिंचवड पोलिसांकडे परवानगी मागीतली होती. मात्र अद्याप ही कोरोनाचे काही निर्बंध कायम आहेत. म्हणूनच पोलिसांनी ही परवानगी नाकारली. पण हे झुगारून सेनेने हा मेळावा घेतलाच. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर असणारे कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करत नाहीयेत, दुसरीकडे मात्र त्यांचे शिवसैनिक अशा प्रकारे नियमांना हरताळ फासत आहेत. मंचावर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालाय तर मंचासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांकडून मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.