पुणे, इंदापूर : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असताना आता धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात विधानपरिषेदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल केंद्राच्या आणि राज्याच्या निकषामध्ये मोठा फरक आहे, यावर तोडगा कसा काढायचा यावर कुणाकडे उत्तर आहे असं वाटत नाही असं त्या म्हणाल्या. 


धनगर समाजाचा प्रश्न हा सभागृहात नेहमीचाच ठरलेला आहे. आंदोलकांबरोबर आमदारांच्याही भावना तेवढ्याच तीव्र असतात. कशा प्रकारे ते आरक्षण द्यायचं यात केंद्राचा निकष आणि राज्याचा निकष यामध्ये मोठं अंतर आहे. त्यामुळे तोडगा कसा काढायचा याच्याबद्दलचं उत्तर कोणाकडे आहे असं मला वाटत नाही. धनगर समाज आज संक्रमण अवस्थेतून जातोय अशा वेळी संवादावरती भर ठेवला पाहिजे. यातून नक्की तोडगा निघू शकतो.


भावना तीव्र झाल्यामुळे स्वत:च जीवन संपवू नका


नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आरक्षणाबाबत भावना तीव्र झाल्यामुळे स्वत:च जीवन संपवणं म्हणजे स्वत:च्या कुटुंबीयांना अजून दुख: देणं आहे. एक बहीण म्हणून माझं आवाहन आहे की, तुमच्या भावना निश्चितपणे तीव्र असव्यात, परंतु त्या भावनातून आपल्याला प्रगती कशी करता येईल, चार लोकांना दु:खामध्ये भरीला घालण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्यातून मार्ग शोधावा. स्व. यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या आवाहनातून मार्ग काढला तर आता जे आपण एकमेकांना शत्रू वाटत आहोत, त्यातून आपला नेमका शत्रू कोण हे ओळखणं सोपं होईल. 


बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो, तोडगा निघेल


कोणावरही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. जर कायदेशीर संकट निर्माण होणार नसतील तर जीआर मध्ये सरकार निश्चित दुरुस्ती करेल. समाजातील जे उपेक्षित आहेत त्यांना न्याय मिळावा हाच सरकारचा प्रयत्न आहे. बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो आहोत, आता काही तासात यामध्ये तोडगा निघेल असं नीलम गोरे यांनी म्हटले आहे.


दरम्यान, जालना इथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनामध्ये आजही तोडगा निघाला नाही. राज्य सरकारने मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राबाबत काढलेला जीआर घेऊन अर्जुन खोतकर मनोज जरांगेंच्या भेटीला आले. पण मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं आहे. मनोज जरांगे यांच्यावतीने एक शिष्टमंडळ राज्य सरकारची भेट घेऊन चर्चा करणार आहे. 


ही बातमी वाचा: