बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राबविण्यात येणारा बारामती पॅटर्नची प्रशंसा करत हा पॅटर्न सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाने व्यक्त केले. महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय कशा प्रकारे केले आहेत, या पार्श्वभूमीवर केंद्राचं पथक पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीला भेट दिली. या पॅटर्नमध्ये काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करून काही सूचनाही केंद्रीय पथकाने केल्या असल्याची माहिती बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.


जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच सध्या शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करीत आहेत, याची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आली आहे. आज हे पथक बारामतीत आले होते. या केंद्रीय पथकातील डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी.के. सेन यांनी आज बारामतीला भेट दिली. या वेळी त्यांनी सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी त्यांना कोरोनाच्या‍ पार्श्वभूमीवर देण्‍यात येत असलेल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची माहिती दिली. यानंतर त्यांनी बारामतीमध्ये ज्या भागात कोरोनोचे रूग्ण आढळले आहेत, त्या भागाचीही पाहणी केली.


कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय


बारामती पटर्नचा इतरांनी आदर्श घ्यावा
डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये बारामती तालुक्यात कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचे सादरीकरण दाखविण्यात आले. सदरचे सादरीकरण पाहून डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी ‘बारामती पॅटर्न’ खूपच प्रभावी असल्याचे सांगून तो इतरांसाठीही मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पोलीस प्रशासनाने जे घरपोच सुविधांसाठी जे पास तयार केलेले आहेत, अशा पासेसची माहिती घेत एक पास सोबत घेऊन गेले आहेत. यापूर्वीही बारामतीला अनेक राजकीय तसेच बड्या व्यक्तींनी भेटी दिल्‍या आहेत. या भेटीत या सर्वांनीच बारामतीचे कौतुक केले आहे, हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे केंद्रीय पथके अनेक भागात दौरे करुन काळजी व्यक्त करीत आहेत. मात्र, बारामतीत येऊन त्यांनीही बारामती पॅटर्नचे कौतुक केले आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी बारामतीकरांचे व बारामतीकरांनी केलेल्या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे.


Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट