बारामती, पुणे : देशाच्या तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता सरकारनेदेखील या तरुणांना रोजगार मिळवून देण्यात लक्ष दिल्यानं त्याचे आभार मानतो.  आजच्या तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज आहे, त्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र यावं, असं ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.  बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते. 


शरद पवार काय म्हणाले?


शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण- तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणाच बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  हाच प्रश्न ओळखून आता सरकार  तरुणांना नोकऱ्या देण्याचं ठरवलं आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो. आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता  विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.  मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.