पुणे: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येचा आकडा 200 च्या वरती पोहोचला आहे. या आजारामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजारावरती उपचार घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोममुळे (Guillain Barre Syndrome) काल (मंगळवारी, ता-18) मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून तिच्यावरची उपचार सुरू होते. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. पुण्यात असताना तिला जीबीएसची लागण झाली होती.
सिंहगड परिसरात राहणाऱ्या किरणला GBSची लागण
पुण्यामध्ये सिंहगड, नांदेड सिटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जीबीएस सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रुग्ण आढळून आले होते, आणि याच परिसरामध्ये किरण देशमुख देखील राहत होती. किरणच्या नातेवाईकांनाही अचानक त्रास जाणवू लागला आणि किरणला देखील त्रास होऊ लागला. जुलाब आणि अशक्तपणा वाढल्यामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील डॉक्टरांना दाखवले. तेव्हा तिला असणाऱ्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 27 जानेवारीपासून तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र, तिची प्रकृती खालावत गेली आणि काल 18 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे. (Guillain Barre Syndrome)
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
GBS हा आजार नेमका काय?
आतापर्यंत राज्यात किरणसह इतर 10 जणांचा GBS मुळे मृत्यू झाला आहे. GBS गुलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिसऑर्डर, आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकार शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नानूंमध्ये कमकुवतपणा येतो. तसंच गंभीर आजारात अर्धांगवायू देखील होतात.
सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
गुलेन बॅरे सिंड्रोम हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असं केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला..
केंद्रीय आरोग्य विभाग आणि यंत्रणा या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आता जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात सैलानीबाबांची मोठी यात्रा असते. देशाच्या कानाकोपऱ्यात या यात्रेसाठी अनेक भाविक येतात. करोना काळात देशातील यात्रा, महोत्सवांवर निर्बंध होते. आता जीबीएसचा धोका वाढत असताना देशभरात जीबीएसचे रुग्ण सापडतायत.त्यामुळे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जीबीएसमुळे यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता बोलून दाखवली.