बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati News) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी झाली आहे. त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. बारामतीतील  आमराई परिसरात हे बॅनर्स लागले आहेत. आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावले आहेत. 


मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या वेगवेगळ्या परिसरात दौरे करत आहे सोबतच विकासकामाचंदेखील उद्घाटन करताना दिसत आहे. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार वेगवेगळ्या विषयांवर भाष्यदेखील करत आहेत. बारामतीत अजित पवारांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहे. या विकासाच्या रथात नागरीकांचीही साथ आहे. यापुढेही आपण आम्हाला साथ द्याल आणि आम्ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालवत राहू, असे आवाहन सुनेत्रा पवारांनी केलं आहे. 


सुनेत्रा पवार मतदारसंघ पिंजून काढणार


बारामती लोकसभेवर सध्या राज्याच्या राजकारणाचं चांगलंच लक्ष लागलं आहे. त्यातच एकीकडे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra pawar) लोकसभेचं मैदान गाजवणार असल्याच्या चर्चा सुरु असताना त्या थेट लोकसभेच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती परिसरातील एक एक भाग सुनेत्रा पवार पिंजून काढताना दिसत आहे. सोबतच अनेक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेच्या भेटी घेताना दिसत आहे. 


काटेवाडीकरांचे आभार!


अजित पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीतील कार्यक्रमांनादेखील त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या सोबतीसाठी काटेवाडीकराचे आभार मानले. पवारांचीच सून किती दिवस काटे वाडीत राहणार आहे, असं लोकांना वाटत असेल परंतु मी जी काटेवाडीतील विकास कामासाठी चिकाटी दिली ती काटेवाडीतील लोकांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर झाली, असं त्या म्हणाल्या. माझ्या कामाचा मूळ पाया काटेवाडीने दिला आहे, असंही म्हणत त्यांनी काटेवाडीकरांना साथ देण्याचं आवाहन केलं. 


बारामतीत नणंद-भावजयांचे दौरे वाढले !


मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच सुनेत्रा पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. त्यांचा विकासरथ तयार करण्यात आला आहे. त्या मार्फत विविध विकासकामांची ओळख त्या बारामतीकरांना करुन देताना दिसत आहे. अर्थात हे सगळं चित्र पाहून सुनेत्रा पवारच लोकसभेच्या उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


इतर महत्वाची बातमी-


Rajesh tope And Ajit Pawar : शरद पवारांचे कट्टर समर्थक भल्या सकाळीच अजित पवारांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण