बारामती, पुणे : बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या (Baramati Loksabha election 2024) मतदानाची तारीख जवळ आली आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 7 मेला बारामती लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यात नणंद विरुद्ध भावजय अशी लढाई आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार फार सभा न घेता एक शेवटची मोठी सभा घ्यायचे. निवडणूक कोणतीही असो शरद पवार (Sharad Pawar) फक्त बारामतीतील मिशनरी बंगल्याच्या मैदानावर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगता सभा घेत आलेत. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी फोडल्यानंतर यंदा पहिल्यांना शरद पवारांना हे मैदान शेवटच्या सभेसाठी मिळालं नाही. त्यामुळे यावेळी शरद पवारांच्या सभेसाठीबारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली आहे. 


बारामतीमध्ये फक्त लोकसभेच्या जागेसाठीच नाही तर यंदा प्रचारसभेच्या जागेवरूनदेखील दोन पवारांमध्ये खडाजंगी  पाहायला मिळाली . प्रत्येक निवडणुकीत बारामतीतील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या  सभेनं होत असते. आधी स्वतःसाठी आणि पुढे लेक सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार सभा घेत आलेले आहेत. मात्र आता शरद पवारांना नव्या जागेचा शोध घ्यावा लागला आणि एवढ्या वर्षांची परंपरा किंवा शिरस्ता खंडला आहे. 


सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेसेठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली.  या नव्या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शरद पवारांसंबधी भावनिक आवाहन करणारे पोस्टर्स सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेत. सभेच्या ठिकाणी आलेल्या लोकांना भावनिक आवाहन पोस्टर्समधून केलं जात आहे. 


शरद पवार आज काय बोलणार, याकडे लक्ष?


बारामतीची निवडणूक यंदा पहिल्या दिवसापासून रंगतदार होती. आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी आणि घराणेशाहीवर यंदा बारामतील प्रचार पार पडला. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात तगडी लढत आहे. नणंद- भावजय अशी जरी ही निवडणूक असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे आणि या निवडणुकीमुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. आता शरद पवारांचं सभेचं मैदान अजित पवारांनी आधीच सभेसाठी काबीज केलं आहे. त्यामुळे लेकीसाठी घेत असलेल्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार?, अजित पवार म्हटल्याप्रमाणे लोकांना भावनिक आवाहन करणार की रोखठोक भाषण करणार हे पाहावं लागणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवणूक ठेवण्याचा कोल्हेंचा डाव, आढळराव यापुढं मौन बाळगणार!