बारामती, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताच महायुतीच्या प्रचार पत्रकांवर राज ठाकरेंचे फोटो झळकताना दिसत आहेत. त्यातच बारामती लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रचार पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. साधारण रोजच्या दौऱ्याचं प्रचार पत्रक जाहीर करण्यात येतं. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा दौरा कोणत्या गावात आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल?, याची माहिती देणारं हे प्रचार पत्रक असतं. या प्रचार पत्रकात आता राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे.
राज ठाकरे महायुतीसोबत युती करणार असल्याच्या मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर ही चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर गुढी पाडव्याच्या मेळाव्यात माझा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागा, असंदेखील राज ठाकरे म्हणाले. बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्य़ा. सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं.
या सगळ्यानंतर आता राज ठाकरेंचे फोटो महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर झळकू लागले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकांवर फोटो दिसत आहेत. अजून महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांच्या प्रचारपत्रकावर फोटो दिसणार आहेत.
सुनेत्रा पवारांचा प्रचार दणक्यात सुरु
सुनेत्रा पवारांचा सध्या दणक्यात प्रचार सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच सुनेत्रा पवार विविध गावभेटी घेताना दिसत आहे. शिवाय त्यांच्या प्रचारासाठी विजय शिवतारेदेखील मैदानात उतरले आहेत. त्यांनी काल सासवडमध्ये सभा आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. तिघांनीही सुनेत्रा पवारांनाच मतदान करा, असं आवाहन केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Junnar Leopard Attack : साखर झोपेतच चिमुकलीला पळवलं; आई-वडिल संतापले; बिबट्यांचे हल्ले कधी थांबणार?
Vijay Shivtare : फाटली, पलटी मारली, अजित पवार मंचावर असताना विजय शिवतारे काय काय म्हणाले?