पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून टिंगरे यांचे विरोधक आणि भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांना पक्षात प्रवेश दिला. वडगाव शेरी मतदारसंघात अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 


भाजपचे माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटात असलेले आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापू पठारे हे शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे.


बापू पठारे हे माजी आमदार असून त्यांना भाजपला रामराम ठोकला आहे. चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नगरसेवकांसह त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडला. माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव यांनीही यावेळी प्रवेश केला.


वडगाव शेरीवर भाजपचा दावा


ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला मिळेल असे सर्वसाधारण सूत्र महायुतीमध्ये आहे. वडगाव शेरीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याने या जागेवर त्यांनी दावा केला आहे. त्यातच भाजपनेही या जागेवर दावा केला आहे.  भाजपचे जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा या आधीच व्यक्त केली आहे. त्यामुळे यावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. 


पोर्शे प्रकरणात सुनील टिंगरे चर्चेत


वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांसोबत गेले. पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर सुनील टिंगरे हे चांगलेच चर्चेत आले होते. पोर्शे  प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांनी उद्योगपतीच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती. परंतु आपण फक्त या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमापुढे येऊन सांगितलं होतं.


ही बातमी वाचा: