Pune News: सध्या सगळीकडेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग वेगळ्या आशयाने वापरण्याचं ट्रेंड सुरु आहे. त्यातच अनेक राजकीय पक्ष टीका करणासाठी हाच डायलॉग वापरत आहेत. पुण्यात देखील अशाच प्रकारचा डायलॉग असलेलं बॅनर बघायला मिळालं. कॉंग्रेसच्यावतीने हे बॅनर लावण्यात आलं आहे. त्यात पुण्यातील मुलभूत सेवांच्या परिस्थितीवर टीका करण्यात आली आहे. पाणी, रस्ते, खड्डे, वाहतुक कोंडी या सगळ्यांवर टीका करण्यात आली आहे.


पुण्यातील कॉग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी हे बॅनर लावलं आहे. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या कारभारावर टीका केली आहे. शहरात सुरु असलेल्या कामांवरुन त्यांनी ही टीका केली आहे. 'काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ते घरपट्टीत वाढ, काय ती पाणी पट्टीत वाढ, काय ती स्मार्ट सीटी, काय तो कोट्यावधींचा घोटाळा' असं त्यांनी या बॅनरवर लिहिलंय. सध्या शहरातील घरांच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि स्मार्ट सीटीच्या नावाखाली अनेकदा मोठे घोटाळे देखील समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं बॅनर पुण्यात लावलं आहे. या बॅनरची पुण्यात चांगलीच चर्चा होत आहे.


काय थाळी, काय बेत, काय चव... एकदम ओक्केमध्ये; पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची हटके स्टाईल जाहिरात
पुण्यात खवय्यांची काही कमी नाही. मात्र याच हॉटेल्सच्या जाहिराती देखील हटके करण्यासाठी पुण्य़ातील व्यवसायिक विशेष मेहनत घेतात. ट्रेन्ड काय सुरु आहे? लोकांना काय आवडेल? याचा विचार करुन अनेक मोठे हॉटेल व्यवसायिक जाहिराती करत असतात. पुण्यात थाळी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या सुकांता हॉटेलची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.  कारण त्यांनी थेट सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगचा  जाहिरातीसाठी वापर केला आहे. काय झाडी, काय डोंगर काय हाटील एकदम ओक्केमध्ये... असा त्यांचा डायलॉग होता. त्यांचंच अनुकरण करत सुकांता हॉटेलनी काय थाळी, काय बेत, काय चव... एकदम ओक्केमध्ये आहे सगळं अशी जाहिरात केली आहे. सुकांता हॉटेल हे पुण्यातील डेक्कन परिसरातील थाळीसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे. सोमवार -मंगळवार असूद्या नाही तर शनिवार-रविवार या ठिकाणी खवय्यांची तुफान गर्दी असते.