पुणे : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलचे उपसंचालक माणिक ठोसरेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. ठोसरे यांनी क्रीडा संकुलाच्या जिममधील एका मजुराला मारहाण केल्याचा आरोप आहे.


पीडित मजूर लक्ष्मण भिसे यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रविवारी सुट्टी असतानाही ठोसरे यांनी भिसेंना घरुन बोलावून घेतलं आणि जिम उघडण्याचा हट्ट धरला. मात्र घरी काम असल्यामुळे भिसेंनी येण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या ठोसरेंनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप भिसे यांनी केला आहे.

ठोसरे हे वारंवार त्रास देत असल्याचा दावा करत भिसे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. ठोसरे हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत.
उपसंचालकपदी असताना त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला होता. तो मिळण्यासाठी त्यांची एशियन गेम्समधील बेंच प्रेस या खेळातील सुवर्ण पदक मिळवणारी कामगिरी कारण ठरली होती.

पुढे चौकशीमधे त्या क्रीडा प्रकारात ते एकटेच स्पर्धक असल्याच उघड झालं होतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता हे मारहाणीचं प्रकरण समोर आले आहे.