Continues below advertisement

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव (Baba adhav) यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना (Pune) हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती.

बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री 8.25 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, बाबांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Continues below advertisement

कोण आहेत बाबा आढाव?

1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख होती, मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. 

93 व्या वर्षीही आंदोलन

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र