पुणे : गेले काही वर्षे पुणे आणि स्वाईन फ्लू हे जणू समीकरणच झालं आहे. यंदाच्या वर्षी पुण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या साथीनं पुन्हा जोरदार डोकं वर काढायला सुरवात केली आहे. 2017 मध्ये राज्यात एकूण 48 रुग्णांना स्वाईन फ्लूमुळे आपले प्राण गमवावे लागले, त्यातले 17 रुग्ण हे पुण्यातले आहेत.
आता या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून शहरात स्वाईन फ्लू विरोधी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर तब्बल 17 रुग्णांना स्वाईन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
यंदाच्या मार्च महिन्यात तापमानाचा पारा खाली जाऊन थंडीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे हे प्रमाण मार्च महिन्यात सर्वाधिक असल्याचंही पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन पुणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी सोमनाथ परदेशी यांनी केलं आहे.
दोन दिवसांपेक्षा जास्त सर्दी, खोकला राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याबद्दल ही सांगण्यात आलं आहे. स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं मोफत टॅमिफ्लू उपलब्ध करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली आहे.