पुणे: शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असं म्हणत जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी (Atul Benke) संभ्रमावस्था कायम ठेवली आहे. अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडून बेनके विधानसभेपुर्वी शरद पवारांची तुतारी फुंकणार का? सध्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. बेनकेंकडून सुद्धा या चर्चेला नेहमी खतपाणी घातलं जातं. आजच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) जुन्नर दौऱ्यात ही बेनकेंनी पवार साहेबांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आणि याचं फ्लेक्सवर अजित पवारांना मात्र स्थान दिलं नाही. इतकंच नव्हे तर गेल्या महिन्याप्रमाणेच आज ही पवारांची भेट घेण्यासाठी बेनके सरसावल्याचं दिसून आलं. विधानसभेपुर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येऊ शकतात, असे सूतोवाच ही बेनकेंनी दिले होते. त्यामुळं बेनकेंच्या डोक्यात काय शिजतंय अशी चर्चा जुन्नरमध्ये रंगलेली आहे. अशातच आपण तुतारी विरोधात लढणार का? असा प्रश्न विचारला असता मी आज सगळं सांगणार नाही, पण पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असं म्हणत संभ्रमावस्था कायम ठेवलेली आहे.


काय म्हणालेत अजित पवार?


मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षासोबत आहे. मी पुढे अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरं जाणार आहे. यामुळं माझी लढाई शरद पवारांच्या विरोधात आहे असं समजायचं काहीच कारण नाही. शरद पवारांनी रूजवलेले विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. आज मी तुम्हाला सगळं सांगणार नाही, पण शरद पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असं आमदार अतुल बेनकेंनी म्हटलं आहे.




अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट


आज शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. आज झालेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनके तुतारी हाती घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अतुल बेनकेंची शरद पवारांसाठी फ्लेक्सबाजी


आमदार अतुल बेनकेंनी आता थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत. आज जुन्नर विधानसभेत शरद पवार  (Sharad Pawar) आलेत, त्यांचं स्वागत अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके तिथं हजर होते.