Sharad Pawar News : पुण्यात अनेकवेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून येतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. एकदा गिरीष बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही अशी आठवण देखील पवार यांनी सांगितली. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीष बापट उपस्थित होते.
एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. महापालिकेत काम करताना अनेक गंमतीदार किस्से घडतात असेही पवार म्हणाले. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, हे पुणे शहराचं एक वैशिष्ट्य असल्याचे पवार म्हणाले. गिरीश बापट, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द होती असेही पवार यांनी सांगितले.
काकडेंना भगतसिंग कोश्यारी आहेत तोपर्यंत विधानपरिषद देऊ नका
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना गिरीष बापट यांनीदेखील जोरदार टोलेबाजी केली. मी बापट असलो तरी अंकुश काकडे पोपट आहेत असे ते म्हणाले. राजकारण हाच व्यवसाय ही सध्या स्थिती आहे. आजकाल सुशिक्षित लोकं मतदान करत नसल्याचे ते म्हणाले. पुण्यात अनेक प्रश्न गंभीर आहेत. पुण्याचा प्राणी प्रश्न मोठा आहे. पण याची चर्चा सभागृहात होत नाही असेही बापट यावेळी म्हणाले. आपल्या आंदोलनातून लोकांचा फायदा होईल अशी आंदोलन झाली पाहिजेत. आपली प्रसिद्ध होईल म्हणून आंदोलन नाही झाले पाहिजे असेही बापट म्हणाले. पुण्यातील गणेशोत्सवाला चांगले स्वरुप आलं आहे. रक्तदान शिबीर होतात. आधी वर्गणीची दादागिरी चालत असे. रात्रभर भोंग्यांचा त्रास होतच असे, त्या भोंग्याचा या भोंग्यशी काही संबंध नाही असेही बापट यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना गिरीश बापट यांनी शरद पवार यांना विनंती केली की. अंकुश काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंग कोश्यारी आहेत तोपर्यंत विधानपरिषद देऊ नका असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या: