पुणे : बागेत दारु पित बसलेल्या मद्यपींनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दारुच्या बाटल्या आणि दगडं फेकून पोलिसांना मद्यपींनी जखमी केले. या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप राळे यांच्या डोक्याला जबर मार बसला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या सर्व प्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मआज अख्तर शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रदीप राळे हे फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत. राळे आणि त्यांचे सहकारी पाटील रात्रपाळी असल्याने बीट मार्शल गस्तीवर होते. कसबा पेठेत असलेल्या उद्यानामध्ये काहीजण दारु पित बसलेले असतात, अशी माहिती त्यांना मिळाली होती. तेव्हा स्मशानभूमीच्या भिंतीलगत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीजवळ तीन ते चार जण दारु पित बसलेले दिसले. राळे यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हिसका देत भिंतीवरुन उडी मारुन पळाला. त्याने जाता जाता पोलिसांच्या दिशेने बिअरची बाटली फेकून मारली. ती बाटली राळे यांच्या कपाळावर लागली. अन्य दोघांनी त्यांच्यावर दगडफेक केली. राळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यामधून रक्त येऊ लागले होते. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.