विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हाती आहेत, असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते काल पिंपरीत बोलत होते. 'यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले, पण यापूर्वी असं कोणी बोललं नव्हतं', असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
अजित पवारांनी भगवान गडाच्या वादावरुन पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पदाचा गैरवापर करणाऱ्या मंत्री फडणवीस यांना कशा चाललात, असा सवालही अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला. 'सरकारमधला मंत्रीच धमकी देत असेल तर ते चुकीचे आहे, राज्याची जनता असले प्रकार खपवून घेणार नाही' असंही ते म्हणाले.
विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, योग्य अस्त्र योग्य वेळी ते बाहेर काढू, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. ‘विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, आम्ही अस्त्रं सांभाळून ठेवली आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढू’ असं फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही काल 'महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही', असे जळजळीत उद्गार जळगावात काढले होते.