Chinchwad bypoll election : चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप(Ashwini jagtap)  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या विधानसभा पोट निवडणूक उमेदवारीवरून आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही, माझा दीर शंकर (Shankar Jagtap) शेठ  हा मला मुलासारखा आहे, असं त्या म्हणाल्या.


अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या जागेवर दावा केला होता. त्यानंतर जगताप कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाले आहेत, अशा चर्चा निर्माण झाली होती. त्यावर अश्विनी जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जगताप कुटुंबीयांचx खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या वावठळ अफवा उडवल्या, असं स्पष्टीकरण अश्विनी जगताप यांनी दिलं आहे. भारतीय जनता पक्षाकडून अश्विनी जगताप यांचं  पोट निवडणूक उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप या पहिल्यांदाच माध्यमांचा समोर आल्या. मी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे, असं त्या म्हणाल्या.


निवडणूकीचा तीस वर्षांचा अनुभव

अश्विनी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. आतापर्यंत त्या लक्ष्मण जगताप यांच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असायच्या. मला देखील निवडणुकीत काम करण्याचा तीस वर्षाचा अनुभव आहे. निवडणुकीत मी पण पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर आणि राहटणी हा भाग पिंजून काढेन, त्यामुळे या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल, असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी बोलून दाखवला. 


शंकर जगतापांना डावलल्यानंतर एबीपी माझाने फोनवरुन त्यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाने दिलेला आदेश मला मान्य आहे. मी या संदर्भात लवकरच माध्यमांसमोर येऊन पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून किमान तीन तास उलटून गेले तरीही शंकर जगतापांनी माध्यमांसमोर येणं टाळलं. त्यामुळे शंकर जगताप नेमकी काय भूमिका घेणार?, यासंदर्भात तर्कवितर्क लढवली जात आहेत. 


अश्विनी जगताप कोण आहेत?

अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे.  लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.